असच आपलं सटर फटर… :भाग आकरा:

“अरे शिवल्या ती आधाराची दोन चाकं काढल्याशिवाय तू नाही शिकणार सायकल…”
“पण मी पडतोय ना?”
“पडूदे”
“हा पडूदे आणि लागूदे… शिवल्या बाबांचं नको ऐकू तू. येईल तुला नंतर आपोआप”
“आपोआप?”
“हो तू काय जन्मतः शिकून आलेलास का?”
“मी शेजार्‍यांच्या सायकली चोरून चालवून शिकलोय. आटलास… डोक्यापेक्षा उंच सायकली”
“पराक्रमच केलात मोठा”
“ओके. शिका कधी शिकायचं तेव्हा”
“बाबा कात्रजची बाग बनवायचीये…”
“बनव ना मग”
“मी झोपतोय तुम्ही बनवा ना प्लिज…”
“***वर फटके देऊ का?”
“पण…”
“प्रोजेक्ट मी स्वतः बनवलाय हे सांगता येईल एवढे तरी कष्ट कर”
“सॉरी बाबा”

मनगटावर संस्कार करायची संधी सापडत नाहिये…. किस्नाबाईच्या काठावरचा डोंगराएवढा वटव्रुक्ष… त्याच्या पैलतिरापर्यंत पाणी शोधत गेलेल्या मुळ्या… भुंड्या दुष्काळी माळाच्या छातीवर झुरमुळ्या हलवीत नाचणारी पिपरण… काहीतरी दाखवायला हवं त्याला. का त्याचं त्याला दिसेल सगळं? त्याला बघायची सवय लावावी लागेल की जगण्याच्या प्रवासात किंवा वाटेवर किंवा प्रवाहात वगैरे तो स्वतःच बघेल ते सगळं…? सटर फटर प्रश्न तर नेहमीसारखे पडतातच आपल्याला… हे ही तसलेच आसतील… पैशांच्या जंगलात हरवेल तो? नोटांच्या कुबड्यांशिवाय कसा जगेल तो? खेळणी ही खेळणीच असतात फक्त? त्यात कसलं आलय जगण्याचं तत्वज्ञान? मला वाटतय हे प्रश्न सटर फटरच असणार….

“बाबा मला धनुष्य पायजे”
“बनवू ऊद्या”
“बनवू?”
“हो. ऊद्या”
“जय गणेश व्हरायटीत गोल्डन मिळतो तोच हवा”
“अरे आता बनवत कुठे बसतो दे ना आणुन ५० रुपयात तर आहे.”
“बरं… आणतो.”

सोनेरी रंगाच्या धनुष्यानं पोरगं भिंतीवरच्या घड्याळावर नेम धरतं आणि मी एक डोळा मिटून महादेवाच्या देवळाच्या दगडी भिंतीवर उगवलेल्या पिपळावर बसलेल्या पोपटाकडे बाण सोडतो.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर माळ्यावरची कापड फाटलेली छ्त्री… तिची एक काडी कमान होते… गळ तुटलेल्या छ्डीचा तंगुस ताणून धनुष्य होतो. ज्वारीच्या गणगाट्याला बाभळीचा काटा लावला की बाण होतो… दारात फिरणार्‍या कोंबडीवर पहिला निशाणा… मग शिकारीला प्रस्थान…

“बाबा हा बाण फुसका आहे”
“अबे पोपट पाडला ना देवळावरचा…”
“पोपट?”
“काय नाय. काय झालं बाणाला?”
” घड्याळ टीपतच नाही. इथेच पडतोय जवळ”
“मग आता काय?”
“मला भवरा आणा”
“का पतंग आणू?”
“नको त्यापेक्षा रिमोट कार आणा…”
“ओके बेटा. उद्याच जयगणेश व्हरायटीत जातो…”

पोरगं जाम खुश होतं.
पन्नास शंभरात विकत मिळणार्‍या या खेळण्यांसाठी आपण केवढे झिजलो ना? पण ह्याला तसं नाही करावं लागणार जय गणेश वाल्याने त्याच्या मनगटाची मशागत रोखून ठेवलीये… त्या मनगटावर आता घामाचे ऊमाळे जन्मणार नाहीत… तिथे गवत माजत जाईल… कचरा साचत जाईल… विकत घेतलेल्या आनंदाचे एवढे थर बसतील की मनगटातल्या चैतन्याची कबर मनगटावरच बांधली जाईल…
अरे देवा केवढासा विषय आणि केवढे ते पाल्हाळ…?
आपली खेळणी आपण नाही बनवली आणि जे मागेल ते दुकानात मिळाले तर त्याच्या व्यक्तीमत्वावर काय असा मोठा परिणाम होणारेय…? तुम्ही बाण, लगोर्‍या, गाड्या स्वतः बनविल्या कारण जय गणेशवाला तेव्हा गुजरात सोडून महाराष्ट्रात आला नव्हता… शहरात कुठून आणणार छत्रीच्या काड्या, तंगूस गणगाटे? बाभळी दिसतात का तुम्हाला टोकाला काटे लावायला? आणी नेम काय चिकन सेंटर वाल्याच्या कोंबड्यांवर लावायचा का? सटर फटर लिहायचं म्हणजे झालं…

पाणी शोधत फिरणार्‍या मुळ्यानी वडाला डोंगराएवढं मोठं केलं…. माळावरच्या ऊन्हाच्या झळा पिपरणीनं सुसह्य केल्या… आमचा बाण भलताच पावरफूल बनला नाही पण फुसकाही निघाला नाही….
हे सगळं भुतकाळी भराड काळजाच्या देवळात घुमत राहतं… आणि जय गणेशच्या व्हरायाट्यांनी झपाटलेल्या झाडांना मोकळं करावं असं वाटून जातं…
पण च्यामारी ह्याचा संस्काराशी आणि व्यक्तीमत्वाशी काही संबंध आहे का?

यावर आपले मत नोंदवा

असच आपलं सटर फटर… :भाग आकरा:

“अरे शिवल्या ती आधाराची दोन चाकं काढल्याशिवाय तू नाही शिकणार सायकल…”
“पण मी पडतोय ना?”
“पडूदे”
“हा पडूदे आणि लागूदे… शिवल्या बाबांचं नको ऐकू तू. येईल तुला नंतर आपोआप”
“आपोआप?”
“हो तू काय जन्मतः शिकून आलेलास का?”
“मी शेजार्‍यांच्या सायकली चोरून चालवून शिकलोय. आटलास… डोक्यापेक्षा उंच सायकली”
“पराक्रमच केलात मोठा”
“ओके. शिका कधी शिकायचं तेव्हा”
“बाबा कात्रजची बाग बनवायचीये…”
“बनव ना मग”
“मी झोपतोय तुम्ही बनवा ना प्लिज…”
“***वर फटके देऊ का?”
“पण…”
“प्रोजेक्ट मी स्वतः बनवलाय हे सांगता येईल एवढे तरी कष्ट कर”
“सॉरी बाबा”

मनगटावर संस्कार करायची संधी सापडत नाहिये…. किस्नाबाईच्या काठावरचा डोंगराएवढा वटव्रुक्ष… त्याच्या पैलतिरापर्यंत पाणी शोधत गेलेल्या मुळ्या… भुंड्या दुष्काळी माळाच्या छातीवर झुरमुळ्या हलवीत नाचणारी पिपरण… काहीतरी दाखवायला हवं त्याला. का त्याचं त्याला दिसेल सगळं? त्याला बघायची सवय लावावी लागेल की जगण्याच्या प्रवासात किंवा वाटेवर किंवा प्रवाहात वगैरे तो स्वतःच बघेल ते सगळं…? सटर फटर प्रश्न तर नेहमीसारखे पडतातच आपल्याला… हे ही तसलेच आसतील… पैशांच्या जंगलात हरवेल तो? नोटांच्या कुबड्यांशिवाय कसा जगेल तो? खेळणी ही खेळणीच असतात फक्त? त्यात कसलं आलय जगण्याचं तत्वज्ञान? मला वाटतय हे प्रश्न सटर फटरच असणार….

“बाबा मला धनुष्य पायजे”
“बनवू ऊद्या”
“बनवू?”
“हो. ऊद्या”
“जय गणेश व्हरायटीत गोल्डन मिळतो तोच हवा”
“अरे आता बनवत कुठे बसतो दे ना आणुन ५० रुपयात तर आहे.”
“बरं… आणतो.”

सोनेरी रंगाच्या धनुष्यानं पोरगं भिंतीवरच्या घड्याळावर नेम धरतं आणि मी एक डोळा मिटून महादेवाच्या देवळाच्या दगडी भिंतीवर उगवलेल्या पिपळावर बसलेल्या पोपटाकडे बाण सोडतो.
शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर माळ्यावरची कापड फाटलेली छ्त्री… तिची एक काडी कमान होते… गळ तुटलेल्या छ्डीचा तंगुस ताणून धनुष्य होतो. ज्वारीच्या गणगाट्याला बाभळीचा काटा लावला की बाण होतो… दारात फिरणार्‍या कोंबडीवर पहिला निशाणा… मग शिकारीला प्रस्थान…

“बाबा हा बाण फुसका आहे”
“अबे पोपट पाडला ना देवळावरचा…”
“पोपट?”
“काय नाय. काय झालं बाणाला?”
” घड्याळ टीपतच नाही. इथेच पडतोय जवळ”
“मग आता काय?”
“मला भवरा आणा”
“का पतंग आणू?”
“नको त्यापेक्षा रिमोट कार आणा…”
“ओके बेटा. उद्याच जयगणेश व्हरायटीत जातो…”

पोरगं जाम खुश होतं.
पन्नास शंभरात विकत मिळणार्‍या या खेळण्यांसाठी आपण केवढे झिजलो ना? पण ह्याला तसं नाही करावं लागणार जय गणेश वाल्याने त्याच्या मनगटाची मशागत रोखून ठेवलीये… त्या मनगटावर आता घामाचे ऊमाळे जन्मणार नाहीत… तिथे गवत माजत जाईल… कचरा साचत जाईल… विकत घेतलेल्या आनंदाचे एवढे थर बसतील की मनगटातल्या चैतन्याची कबर मनगटावरच बांधली जाईल…
अरे देवा केवढासा विषय आणि केवढे ते पाल्हाळ…?
आपली खेळणी आपण नाही बनवली आणि जे मागेल ते दुकानात मिळाले तर त्याच्या व्यक्तीमत्वावर काय असा मोठा परिणाम होणारेय…? तुम्ही बाण, लगोर्‍या, गाड्या स्वतः बनविल्या कारण जय गणेशवाला तेव्हा गुजरात सोडून महाराष्ट्रात आला नव्हता… शहरात कुठून आणणार छत्रीच्या काड्या, तंगूस गणगाटे? बाभळी दिसतात का तुम्हाला टोकाला काटे लावायला? आणी नेम काय चिकन सेंटर वाल्याच्या कोंबड्यांवर लावायचा का? सटर फटर लिहायचं म्हणजे झालं…

पाणी शोधत फिरणार्‍या मुळ्यानी वडाला डोंगराएवढं मोठं केलं…. माळावरच्या ऊन्हाच्या झळा पिपरणीनं सुसह्य केल्या… आमचा बाण भलताच पावरफूल बनला नाही पण फुसकाही निघाला नाही….
हे सगळं भुतकाळी भराड काळजाच्या देवळात घुमत राहतं… आणि जय गणेशच्या व्हरायाट्यांनी झपाटलेल्या झाडांना मोकळं करावं असं वाटून जातं…
पण च्यामारी ह्याचा संस्काराशी आणि व्यक्तीमत्वाशी काही संबंध आहे का?

यावर आपले मत नोंदवा

वळीव आलाय बया… वळीव!

“पिंट्या, भाड्या बिरमुट्यायवडी पुरगी घागर घिऊन इतीया आणि तूला उचलना हुय?”
उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्या घरी गेलो की हे वाक्य ऐकावं लागणार हे ठरलेलच असायचं. आम्ही चार भावंडं. मी थोरला, माझ्या माग बया आणि जिजा ह्या दोन बहिणी आणि शेंड्यावर पोपटराव हे बंधुराज. बारसं घालताना आईनं चांगली वामन, ज्योती, शुभांगी, महेश अशी नावं ठेवलेली. पण म्हातारीनं घोळ केलेला. म्हातारी म्हणजे वडिलांची आई. समाजाचे भान ठेऊन तिला आज्जी म्हणायला पाहिजे होतं पण ते घडलं नाही. आई नेहमी सांगायची ‘पिंट्या, म्हातारीला देवळातन बुलवुन आन’ ‘बया, म्हातारी कुटं गिली बग’ ‘जिजीला म्हातारीकड दिवन यं’ मग आम्हीपण तिला ‘म्हातारे, बापुनी बुलीवलया’ असचं म्हणायचो. त्याचा बदला म्हणुनच तिनं आमची अशी नावं पाडली असावीत. पहिलीत नाव घालताना माझं नाव वामन घालयचं सोडून हनुमंत घालत होती. हेडमास्तरनी समजाऊन सांगितल तेव्हा नु ची शेपटी गाळायला तयार झाली आणि शाळेला हणमंत मिळाला. आई रानात गेलेली तेवढ्यात म्हातारीने हा कारभार उरकलेला. घरी आल्यावर तिला कळालं तेव्हा सासु सुनेत तुंबळ दंगल झाली. माझ्या नावारून मी पाचवी सहावीत जाईपर्यंत ह्यांच्या वादविवाद स्पर्धा व्हायच्या. साधारण मसुदा असा असायचा…
“वामन घालायचं सोडून हाणमंत कुणी घालायला सांगितल्यालं?”
“मग त्यला काय हुतया? चांगला मंगळवारचा जलामलाय म्हणून घातलं”
“बेस केलसा (पुटपुट्पुटपुट)”
“कुरकुराय काय झालया”
“म्या बामणाला इचारून पाळण्यात ठेवल्यालं नाव सुडून कशाला ह्यो उद्योग केलासा मग?”
“कुंच्या बामणाला इच्यारल्यालंस त्येला इचारुन यजा परत हाणमा काय वायट हाय का म्हणून”
“आता कशाला जातीया…”

शेवटी आता बदलणे शक्य नाही तर कशाला चर्चा म्हणून आई माघार घ्यायची. पण बाकीच्या तिघांची नावं घालताना तिनं म्हातारीला मधे पडू दिलं नाही. मला वामन काय नी हनुमंत काय काही फरक पडला नाही भांडणं लागल्यावर किडकी मिडकी पोरं हुप्प हुप्प म्हणायची पण जवळ यायला टरकायची. तेव्हा मी पण छाती काढून हुप्प हुप्प करायचो.

ज्योतीचं नावं म्हातारीन बया ठेवलं घरी बाहेर सगळे तिला बयाच म्हणायचे, शुभांगीची जिजा झाली आणि महेशचा पोपट्या झाला. जिजा आणि पोपट आमच्या दोघांपेक्षा लहान त्यामुळं सगळा लाड त्यांचा आणि सगळी कामं मी आणि बयानं करायची. खरं तर बयानच करायची. माझं आजोळ गावाजवळच होतं आणि आईच्या आईला मुलगा नसल्यानं मला दुसरीत असतानाच आजोळी ठेवलेला. आज्जीच्या लाडानं आमचा लाडोबा झालेला त्यामुळं कामाच्या नावानं चांगभलच होतं.
असा सुट्टीत आलो की मग माझी दमछाक व्हायची. लहान असून बयाला ती कळायची.
“र्‍हावदे दादा, मी भरते पाणी. तू नुसता सुबतीला चल” असं म्हणून ती भल्या मोठ्या घागरी घेऊन झार्‍याकडं चालू लागायची.
आळीतली सगळीच माणसं बयाचं कौतूक करायची. जराशी उजळ असती तर मी तिला सावळी म्हणालो असतो पण सावळी नव्हतीच ती. रंगानं काळी, चार भावंडत उजव दिसणारं नाक, सतत भिरभिरणारे, बोलघेवडे डोळे, हसायला लागली की आई म्हणायची “घर पाड्शील की बया”. तिला कसली भिती नव्हती. सरावलेल्या बायकाही घाबरायच्या अशा उंच भिंती सारवताना हलक्या अंगान शिडीवर चढायची आणि चटक्यात काम उरकून खाली यायची. वयाला न शोभणारा तो समंजसपणा आणि कष्टाळू वृत्ती बघून आईला तिचा खूप अभिमान वाटायचा. पण तिचा धाडसी स्वभावं बघून भितीही वाटायची. खोडक्या गोळा करायला शिवारभर फिरताना इच्चु-सापाची भिती, झर्‍याच्या भवती तर कायम साप फिरत असायचे. बया आईचा फार मोठा आधार होती. आई रानात गेली की घरात एकही काम पडायचं नाही. सगळं उरकून बया शाळेला जायची. माघारी आली की जिजा आणि पोपट्याला खेळवायची.
घरापासून शंभरेक फुटावर असणारा ओढा पावसाळ्यात जसा रात्रंदिवस खळखळत असायचा तशी बया नेहमी एकतर हसत खिदळत असायची नाहीतर राबत असायची. उन्हाळ्याची सुट्टी संपेपर्यंत मी नुसता सगळ्यांकडून तिचं कौतूक ऐकत असायचो आणि माझ्या आळशीपणाबद्दल टोमणे खात रहायचो… मग दरवर्षी एक दिवस यायचा… वळवाचा… लख्ख पडलेल्या उन्हावर अंधारी सावली पसरायची आणि मनभर पसरलेल्या रखरखीच्या जागी गार हवा भरून जायची. अंगणात वाळत घातलेल्या खुरवड्या उडून थोड्या पत्र्यावर तर थोड्या रस्त्यावर जायच्या… म्हातारी जिजा आणि पोपट्याला घेऊन आत पळतानाच ” खुरुड्या गेल्या बगे पोरे पळ…” म्हणून ओरडायची. त्या गोळा करायला मी आणि बया धावयचो पण वार्‍याच्या झापाट्यान कोलमडतानाच डोळ्यात धूळ जायची आणि घाबरून मी परत घरात पळायचो… बया मात्र मिळतील तेवढ्या खुरवड्या गोळा करायची आणि मगच घरात यायची. सोसाट्याचा वारा भिती दाखवत असायचा एवढ्यात आभाळ वाजू लागायचं… आता आपल्यावर वीज पडणारं या भितीनं मी स्वयपाकघरात जाऊन बसायचो… तेवढ्यात आई घरात यायची… बया उंबर्‍यावर उभा राहून ओरडत असायची “दादा भायर य की… आता गारा पडतिल्या बघ… गोळा करायच्या आणि सरबत करायचा.” आवाज देत आभाळ धरणीला भिडायचं… भला मोठा थेंब पत्र्याचा ढोल करून वाजवत रहायचा… त्या तालावर बया टाळ्या वाजवत बेभान व्हायची… “बया, भायर जाव नगं बर का सांगतीया… यकादी गार बसली डोक्यात मजी कळल मग” आई ओरडायची पण वळवाच्या पावसाशी जन्मोजन्मीचं नातं असल्यासारखी बया त्याच्याशी समाधिस्त झालेली असायची. मग आभाळ बयाच्या सरबताची सोय करायचं बर्फाचा एकेक खडा अंगणात पडू लागायचा… हातात पातेलं घेऊन बया पडत्या पावसात तडातड उडणार्‍या गारा गोळा करायला धावायची… “आता काय म्हणू ह्या पुरीला” म्हणत आई कौतुकानं तिच्याकडं बघत रहायची आणि मी मोठ्या धाडसानं आईच्या मागे बसून बयाला ‘हिकड आली बग… ए ती बग मुट्टी गार हाय… दगडामाग चार हायत्या बग’ असा प्रोत्साहन देत रहायचो. जमतील तेवढ्या गारा पातेल्यात घेऊन बया आत यायची… चिंब भिजलेली असताना गारेगार सरबत करायच्या तयारीला लागायची… आई म्हणायची “त्यात जरा पानी वत मजी लगीच इताळतील्या आणि सरबत पण लय हुईल” पण बयाला गारांच्या पाण्याचाच सरबत हवा असायचा… गारा वितळेपर्यंत वाट बघायची, लिंबू आणायचा कुठला? मग त्यात साखर घालायची जरा मीठ घालायचं की झाला सरबत तयार… दोन दोन घोट सगळ्यांना मिळायचा. बयाच्या कष्टाची कमाई… सरबत पिताना कित्ती मज्जा वाटायची… सरबत पिऊन होईपर्यंत बयाच्या कपाळावर दोनतीन टेंगूळ आलेले असायचे. मग तिला कळायचं की आपल्याला गारानी चांगलच झोडपलय. तिचे टेंगूळ बघून जिजा खदखदून हसायची तशी “सरबत पेताना हासलीस का?” म्हणून बया तिला चिमटा काढायची. वळीव शांत व्हायचा तशी बयाही एकटक रित्या आभाळाकडं बघत बसायची…
उन्हाळ्याची वाट बघत मी आजोळी वर्ष काढायचो. आणि वळवाची वाट बघत आम्ही उन्हाळा काढायचो. कधी एकवेळा पडायचा तर कधी खूप वेळा भेटायचा… आठवीचा उन्हाळा म्हातारी मेल्याच्या दु:खात गेला. नववीची वार्षिक परिक्षा संपली आणि मला गावाची ओढ लागली… पण दरवर्षीसारखे वडील मला न्यायला आले नाहीत.
“बापू कसं काय आलं न्हायती न्ह्याला?” मी आज्जीला विचारलं.
“यंदा उशीरा जायाचं… कामं हायती त्यासनी”
“पर मग कदी जायाचं?”
“सांगावा आला की सांगते तुला… जा खेळायला”
मला चैन पडत नव्हता. खेळात लक्ष लागत नव्हतं. रात्री झोपही लागेना…
“वन्सं, काय झालं व मंगीच्या पुरीला?” शेजारजी वच्ची काकू आज्जीला विचारत होती.
मी जागाच होतो.
“भाजलीया… दुपारची कालवण गरम करायला गीली आणि स्टो पिटीवताना भाजली”
आज्जीचा आवाज कापरा होता… ती रडतच होती… माझ्या लक्षात आलं, बया आजारी आहे. बयाला भाजलय…
“पर लय न्हाय न्हवं झाल्यालं…”
“धा हजार गेलं. पावन्यानं रान घाण ठेवलया, म्हस इकली तरी आजून दवाखाना चालूच हाय… क्रुष्णा हास्पिटलात ठिवलीया”
“काय बाय त्या मंगीच नशीब तरी… दोन वर्सात लग्नाला इल पुरगी…आणि ही काय मदीच…”
वच्ची काकू हळहळली आणि आज्जी हुंदके देऊन रडायला लागली…
दुसर्‍या दिवशी आज्जीला न सांगता घराभायर पडलो. दोस्ताची सायकल घेतली आणि थेट घरी गेलो. बापू शिरडी आणि दोन करडं घेऊन निघालेले… आई दारात उभी होती. मला बघीतलं आणि बापूनी तोंड फिरवून डोळ्याला हात लावला… आईन पळत येऊन मला जवळ घेतलं… तिचं रडण बघून मला भिती वाटायला लागली…
“बापू कुटं निगाल्याती?”
“बाजारला. शिरडी इकून दवाखान्यात पैसं भरायचं हायती”
“मग मी बी जातो. मला बयाला बगायचं हाय”
“नगं, परवा सोडणार हायती तिला. तवा बग तिला. आता हाय चांगली.”
“मग मला सांगितल का न्हाय?”
“काय करू सांगून? भाजलय तिला, डॉक्टरन सांगितलय सारख कुणाला बुलवू नगा”
डोळे पुसत बापू जवळ आले.
“पिंट्या, चांगली झालीया आता ती, परवा घरी आणायचं हाय म्हणून तर शेरडं इकतुया… मी यतो जावन तू घरी थांब”
दोन दिवसात रडून रडून डोळ्याचं पानी आटून गेलं.
“बोलाय लागलिया चांगली आता” बापुनी सांगितलं तसे सगळ्यांचेच चेहरे उजळले. पोपट्याला मांडीवर घेऊन बसलेल्या आईन जागेवरूनच देवाला हात जोडले.
“कधी आणायची घरी?” आईन विचारलं.
“उद्या सकाळी न्ह्या म्हणलाय डाक्टर”
“बेस झालं… बरी हुदे मजी झालं चांगली..”
संध्याकाळीच बापू एक चुलतभावाला घेऊन कराडला दवाखान्यात गेले. दुसर्‍या दिवशी सकाळपासून मी गावाबाहेर येऊन त्यांची वाट बघत बसलो… दुपार टळली… चार वाजत आले… चारची एसटी गावात गेली… एसटीत बापूंसोबत गेलेला काका दिसला. बया आली म्हणून मी एसटीच्या मागं पळत सुटलो… काका एकटाच होता.
“बया आणि बापू?”
गळ्यातल्या टावेलानं डोळे पुसत त्यान मला छातीशी धरला.
“त्यासनी सा वाजतील्या घरी याला… चल घरला”
“नगो मी वाट बगतो फाट्यावर..”
“आरं कशाला वाट बगतुयास?…”
त्याच्या डोळ्याची धार थांबत नव्हती… मी खुळ्यासारखा त्याच्याकडं बघत होतो. आळितली माणसं जवळ आली….
“काय झालं रं?”
“गिली बिचारी…”
सगळ्यांचे चेहरे उतरले… एकजण पळत घरी गेला. थोड्याच वेळात आईचा हंबरडा कानावर पडला आणि हातपाय तुटल्यासारखा मी लुळा होऊन कोसळलो… रखरखणार्‍या उन्हावर गार काळी सावली पसरायला लागली… वारा भिती दाखवायला लागला.. आभाळ वाजायला लागलं… कुणीतरी मला उचलून घरी आणलं… भल्या मोठ्या थेंबानी पत्र्याचा ढोल केलेला… गारा तडातड उडू लागल्या आणि “वळीव आलाय गं बया…. गारा यचायला यत न्हाईस का… वळीव आलाय बया…” म्हणत आई वेड्यासारखी अंगणात धावली. मी तिला आत आणायला अंगणात धावलो… गारांनी अंगावर वार केले… “नुसत्या गारांच्या पाण्याचा सरबत करायचा…” बया कानात कुजबुजून गेली आणि आईला सावरायचं सोडून मी अंगावर गारा झेलत तसाच उभा राहिलो… लोकांनी आईला आत नेलं.

“पिंट्या, थोरला हायसं. तूच असा रडत बसलास तर त्यासनी कुणी आदार द्याचा?”

हळू हळू वळीव शांत झाला… आणि वळीव थांबता थांबता हॉस्पिटलची गाडी दारात आली… पांढर्‍या कापडात बांधलेली बया… तिला पाहिलं आणि आईचा आवाज बंद झाला. बापू भिंतीला कपाळ लाऊन हमसून हमसून रडत होते. प्रत्येकजण डोळे पुसत त्याना समजावत होता… मी घरातला मोठा होतो… मी आता रडणार नव्हतो… जवळ जाऊन तिला बघितलं… “वळीव कोसळून गेला बया… कुणी गारा यचल्या न्हाईत” न बोलता तिला एवढाच निरोप दिला पण तिला माहिती असल्यासारखी मोकळ्या झालेल्या आभाळाकड एकटक बघत ती शांत झाली होती… मी रडलो नाही. तिचे सारे विधी पार पडेपर्यंत… उन्हाळा संपेपर्यंत… वळीव शांत होईपर्यंत… आता वळीव आला की गारा वेचाव्याश्या वाटतात… वळवात भिजणारी पोर दिसली की तिला गारांचा गारेगार सरबत मागावा वाटतो…

“बया, काल वळीव येऊन गेला… दादानं गारा वेचल्या पण सरबत जमला नाही गं….”

यावर आपले मत नोंदवा

Shivanshu Hanmant Shinde

 

my bacchu…. Shivanshu. we call him Babban

यावर आपले मत नोंदवा

तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

तुझ्याहून मोठा गुन्हेगार आहे

तुला लोकशाही नमस्कार आहे

जरी देश दिसला कफल्लक तुला हा

तिजोरीत मोठा चमत्कार आहे!

कसे लोकसंख्या नियंत्रण करावे

घरी लोड शेडींग… अंधार आहे!!!

किती मर्द झिंगून मेले तरीही

बुळ्याचीच बाईल गरवार आहे

अशी टाळते का मला भेटणे ती?

(तिला मी असे काय करणार आहे?)

किती धाडसाने तिचा हात धरला

म्हणाली ‘गडे तू किती गार आहे’

ह्.बा.शिंदे

यावर आपले मत नोंदवा

श्रावण

जुना रस्ता जुन्याच डोहात नवा पाउस मिसळुन गेला

यंदा श्रावण तुझ्याशिवाय एकटा एकटाच कोसळुन गेला

 

तुला पावसात शोधण्यासाठी रोज छत्री विसरुन आलो

रडेपर्यंत हसशील म्हणून जुन्याच चिखलात घसरुन आलो

चिखल म्हणाला, जुनाच दोस्त आज नव्यानं ढासळुन गेला

यंदा श्रावण तुझ्याशिवाय…..

 

सुसाट वारा उलटी छत्री कसलाच किस्सा घडला नाही

तुझा साधा रुमाल सुध्दा यंदा चिखलात पडला नाही

डोह म्हणाला, स्वच्छ रुमाल गढुळ पाण्यात विसळुन गेला

यंदा श्रावण तुझ्याशिवाय….

 

पावसाच्या भिंतीआड मोकळं मोकळं मंदीर नाही

चित्रपट पाहतानाही तुझ्या पायावर उंदीर नाही

माझे एकटे पाय बघुन, वेंधळा उंदीर गोंधळुन गेला

यंदा श्रावण तुझ्याशिवाय…

 

मागचा श्रावण पुढचा श्रावण भरून वाहतील जोडीनं

एवढा एकच व्याकुळ होईल सखे तुझ्या ओढीनं

श्रावण म्हणाला, समजुन घे, एक डाव भुताला दिला

यंदा श्रावण तुझ्याशिवाय……

 

(‘अस्तासाठी व्यस्त जगणे’ या माझ्याच कवितासंग्रहातुन) -ह. बा. शिंदे

यावर आपले मत नोंदवा

गोर्‍या माकडाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य….

“जेम्स लेनच्या पुस्तकास आक्षेपार्ह मजकुरासह विक्रीस परवानगी”

फार काही लिहीत बसत नाही पण महाराष्ट्रातल्या विचारवंतानी आपले अस्तित्व सिध्द करण्याची आणि मराठी जनतेने आपली शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे. महत्वाचे म्हणजे शिवरायांच्या नावावर जगणार्‍या पक्षानी राजकिय, मलिदाखाऊ वृत्ती बाजुला ठेऊन, निस्वार्थपणे या लढ्यात उतरून ही लढाई जिंकुन दाखवायला हवी.

आता शांत बसून चालणार नाही…

  • गोर्‍या माकडाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मराठी माणसाच्या श्रध्दास्थानांपेक्षा महत्वाचे आहे का?
  • या प्रकाराला ज्या आपल्यातल्याच शेणखाऊनी सुरूवात केली त्यांना आणि तशा अवलादिच्यांना ठेचून मारले पाहिजे!
  • जिजाऊंकडे बोट दाखवणार्‍यांचे हात छाटले पाहिजेत.
  • आता गप्प बसलो तर उद्या ते आपल्या हातात बांगड्या भरायला मागे पुढे पाहणार नाहीत.
  • आपल्या परिसरातील पुस्तक विक्रेत्यांवर लक्ष ठेवा. विक्री होताना आढळल्यास त्वरित विरोध करा.
  • ही अस्मितेची लढाई आहे…. अस्तित्वाचा प्रश्न आहे. जमेल त्या मार्गाने विरोध करा. निषेध करा.

                                                        ह्.बा. शिंदे

2 प्रतिक्रिया

जाणवे, विसरून गेलो…

 

जाणवे, विसरून गेलो, चूक झाली

मी तुला माझा म्हणालो, चूक झाली

 

राज्य चाले जे तहांच्या बोलण्यांवर

मी तिथे लढण्यास आलो, चूक झाली

 

पाहिजे होते जया हुजरेच सारे

मी तया शिरजोर झालो, चूक झाली?

 

का पिल्यावर चांगल्या सुचतात गझला?

मी कधी नाहीच प्यालो, चूक झाली?

 

शेवटी म्हणशील येऊनी हबा ला

‘मी विना लढताच मेलो, चूक झाली’

– ह. बा. शिंदे

 

माझ्या इतर गझला वाचण्यासाठी www.sureshbhat.in  इथे भेट द्या. ‘ह बा’ या नावाने मी इथे लेखन करतो.

Posted in kavita, gazal, charoli etc. | 2 प्रतिक्रिया

तुझ्या जोडीस घे तिजला…

तुकारामा उगा तू काढली पाण्यातुनी गाथा
सुखी जातीत होते ते, सुखी जातीत ते आता

तुझ्या जोडीस घे तिजला अता घनघाव घालूदे
जिच्या नाजूक हाताने जगाचा चालला भाता

बलात्कारी, खुनी की दंगली घडवून बनलेला
पुजेला कोणता नेता हवा रे पंढरीनाथा?

कधी ना वाटले मुकलो भुईला जन्म देणार्‍या
जिथे मी टेकला माथा तिथे ती भेटली माता

परीक्षा घेउनी तर भेटीला येतोस की देवा
करावी सावकारी तू म्हणावे मी तुला दाता?

– ह. बा. शिंदे

Posted in kavita, gazal, charoli etc. | यावर आपले मत नोंदवा

सावित्रीबाई फुले

अंधरात जन्मलेल्यांना डोळे झाकुन आणि मनाची कवाडे बंद करून जगण्याचीच सवय लागते हा इतिहास होता. पण, जन्माला येताच हक्काची सृष्टी पाहण्याचा अविरत ध्यास घेणारी माऊली जन्माला आली आणि परंपरांच्या बुरूजांना सुरूंग लागले. उंबरठ्या बाहेरची माती कपाळी लाउन मराठी स्त्री मुक्ततेच्या वाटेवर स्वच्छंद भरारी घेऊ लागली. आडाणीपणाचा अंधार नाकारून ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणार्‍या त्या विद्येच्या देवतेचे नावं सावित्रीबाई फुले.

गावचे पाटील असणारे वडिल, खंडोजी नेवसे पाटील आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी सावित्रीबाईंचा जन्म झाला.

इंग्रजांची सत्ता, सनातन्यांनी मांडलेला उच्छाद, देव आणि धर्माच्या नावाखाली वर्चस्व गाजविण्यासाठी तत्कालीन सवर्णांनी इतर जातींचा चालवलेला छळ अशा वातावरणात सावित्रीबाइंचा जन्म झाला. या काळात हिंदू स्त्रीचे अस्तित्व निव्वळ उपभोग्य वस्तू एवढेच होते. तिने शिक्षण घेणे हे पापच होते. ती काही मागू शकत नव्हती आणि तिला नाही म्हणण्याचा अधिकार नव्हता.

एकूणच स्त्री स्वातंत्र्य ही संकल्पनाच अस्तित्वात नसलेल्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्‍या धटिंगणाला अद्दल घडविली आणि पक्ष्यांची अंडी खाणार्‍या नागाला त्यांनी ठेचून मारलं, तेव्हाच सनातन्यांच्या विरोधाला मोडून काढण्याचा श्रीगणेशा झाला.

त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला सावित्रीबाईंच्या उशीर(?) झालेला, लग्नाच्या वेळी त्यांचं वय होतं नऊ वर्षांचं. त्यांचे पती ज्योतिरावांचं वयही पुढं गेलेलं (?)ते तेरा वर्षांचे होते. फाल्गुन वद्य ५, शके १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योती-सावित्री विवाहबद्ध झाले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

ज्ञानासाठी आणि मुक्तिसाठी आतूर असलेले दोन डोळस शक्तीप्रवाह एक झाले होते. ‘सवर्णांनी करेल ते पुण्य आणि आपण शिकलो तरी ते पाप?’ हा ज्योतिरावांनी वडिलांना केलेला सवाल सावित्रीबाइंना जोतीरावांच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’ या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांना स्फुर्ती मिळाली. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवलं. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतलं आणि भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली. अंधारमय स्त्री जीवनात प्रकाशाचा पाऊस झाला…. १ मे, १८४७ रोजी मागासांच्या वस्तीत एक शाळा सुरू झाली.

पुढे भिडेंच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील. भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले. दिनांक १ जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात अखंड हिंदुस्थानातली स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिली मुलींची शाळा सुरू झाली. सावित्रीबाई ‘हेडमिस्ट्रेस’ झाल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. पतीच्या निधनानंतर स्त्री ला सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. भ्रुणहत्या होत किंवा आत्महत्या.

ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.

उंबर्‍याबाहेरच्या जगात आपल्या सामर्थ्याने जगाला दिपविणार्‍या प्रत्येक स्त्रीच्या यशामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचा इतिहास आहे. वाईट ते टाकून देऊन प्रत्येक सजीवाला जगण्याचा अधिकार मिळावा ही सज्जनांची धडपड असते. त्यासाठी स्वत:च्या घराची, आयुष्याची पडझड झाली तरी त्यांना त्याची तमा नसते. ज्योती-सावित्री हे याच न्यायानं समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करून अखंड धडपडत राहिले.

 इ.स. १८९६-९७ च्या दरम्यान पुणे व परिसरात प्लेगने धुमाकूळ घातला. कुणालाच माहिती नसणारा हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर इंग्रज सरकारने एक नवीनच उपाय शोधला. रोगी दिसला की, त्याला जबरदस्तीने उचलून नेले जाई व नंतर तो कधीच परत येत नसे. तो मेला की त्याला मारले गेले, काहीच कळत नसे. लोकांचे हे हाल सावित्रीबाईंना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडीतांसाठी ससाणे यांच्या माळावर (पुणे शहराजवळ) हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वत: रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.

इतरांच्या जीवनज्योतींना पदराचा आडोसा देताना स्वत:च्या प्राणांना लागलेली धग त्या माऊलीला जाणवलीच नाही. सावित्रीबाईंना प्लेग झाला. सामांन्यांसाठी जगणारी ही ज्ञानगंगोत्री अखेर सामान्यांच्या प्रवाहात सामांन्यांसारखीच विलीन झाली.

याविषयी माझा सविस्तरलेख https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=23&pmid=5&id=760 

इथे वाचा.

ह. बा. शिंदे

Posted in lalit, samajik lekh | यावर आपले मत नोंदवा